राजापूर तालुका, रत्नागिरी जिल्हा, महाराष्ट्र पिनकोड 416707

शेती व बागायती

कशेळीतील शेती व बागायती

कशेळीच्या भौगोलिक रचनेमुळे — अरबी समुद्र, खाडी, खारबांध, उतार आणि माळ — गावात विविध प्रकारची शेती शक्य आहे. भात हे मुख्य अन्नधान्य आहे.

भातशेती

सुमारे ४०० वर्षांपूर्वी बांधलेल्या देसाई खार बांधामुळे खारे पाणी अडवले गेले आणि सुमारे ३०० ते ४०० एकर जमीन भातशेतीयोग्य झाली. या जमिनीत वर्षातून दोन वेळा — उन्हाळी व पावसाळी — भातशेती केली जाते. वायंगोड व आगमाचा अशा दोन छोट्या नद्यांच्या काठावरही पावसाळी भातशेती शक्य आहे.

नारळ & सुपारीच्या बागा

भातशेतीच्या वरील भागावर नारळ व सुपारीच्या मोठ्या बागा आहेत. ही बागायती १५–२० वर्षांत ग्रामस्थांच्या पंपयोजनेमुळे मोठ्या प्रमाणावर वाढली.

हापूस आंबा व काजू

घरांच्या वरील बाजूस हापूस आंब्याच्या बागा, काजूच्या बागा व त्यावरील माळावर कातळातील मातीत भातशेती व गुरेचराईची कुरणे — अशी डोंगर उतारावरील गावाची ठेवण आहे. कशेळीच्या हापूस आंब्याची आजही विशिष्ट ख्याती आहे.

आधुनिक यंत्रणा व जलसिंचन

  • एकात्मिक ग्रामीण विकास योजनेखाली २५ शेतकऱ्यांच्या जोडगटांना (५ प्रत्येकी) इलेक्ट्रिक पंप — पाणी पुरवठ्यासाठी.
  • गावात एकूण १२५ इलेक्ट्रिक पंप चालू.
  • १५ गोबर गॅस प्लांट चालू आहेत.
  • ५ पीठाच्या व भाताच्या गिरण्या आणि एक लाकूड चिरकामाची गिरण.
  • शासनाने पुढे सावरे वहाळ धरण (सुमारे १ कोटी खर्च) मंजूर केले असून पूर्ण झाल्यावर कशेळी, नवेदर व वेल्ये गावांना सुमारे १,००० एकर क्षेत्रासाठी पाणी मिळेल.

आदर्श शेतकरी

कशेळीचे शेतकरी श्री शरद बाळकृष्ण धनाक्स यांनी रत्नागिरी जिल्ह्याच्या भातशेती स्पर्धेत २ वेळा तालुक्यातील व जिल्हास्तरीय प्रथम बक्षीस मिळवले.

सहकारी आधार

कशेळी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि. (स्थापना १९१६) शेतकऱ्यांना शेतीसाठी कर्ज, खत पुरवठा, सुधारित बियाणे व ग्राहक भांडार उपलब्ध करून देते.