देवालये
कशेळीची देवालये
कशेळीच्या सर्व विकासात अत्यंत महत्त्वाचे आहे ते भगवंताचे अधिष्ठान — गावदैवते कै. ग्रामस्थांना नवीन कार्याची स्फूर्ती देत आली आहेत. मुख्य पाच ग्रामदैवते आणि श्रद्धास्थाने पुढीलप्रमाणे :
श्री कनकादित्य सूर्यमंदिर
गावाचे मुख्य दैवत. इसवी सन १२व्या शतकात द्वारकेहून आणलेल्या सूर्यनारायणाची स्थापना. ताम्रपटाद्वारे ८०० वर्षांहून अधिक इतिहास सिद्ध. वार्षिक उत्सव माघ शुद्ध ७ ते ११. — सविस्तर माहिती →
श्री लक्ष्मीनारायण मंदिर
कनकादित्य मंदिरापेक्षा सुमारे २००–३०० वर्षे जुने. तळघरातून थेट समुद्रकिनाऱ्यापर्यंत भुयार जाते अशी आख्यायिका असून तेथे समुद्राच्या लाटांचा आवाजही ऐकू येतो. संभाजी महाराजांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचे म्हणतात. पुजारी परांजपे घराणे (गावखडी; आता सोलापूर येथे स्थायिक); लक्ष्मीनारायण हे परांजपे घराण्याचे कुलदैवत.
श्री जाखादेवी
कनकादित्य मंदिराशेजारीच असलेले प्राचीन देवालय. कनकादित्याची पत्नी कालिकादेवी (देवूळ कालिकावाडी) यांची हिच बहीण. नवरात्रात देवळात विशेष उत्सव. पुजारी गुरव घराणे.
श्री आगबादेवी
हे देऊळही फार पुरातन. ही देवी संसारिक माणसांच्या अडीनडी दूर करते अशी समजूत असल्यामुळे जिल्ह्यातील लांबवरचे लोक प्रसाद नवस घेऊन येतात. व्यवस्था कुळकर्णी, शिरवडकर, बावकर, गोठणकर, जुवळे या तीन वाड्यांतील ग्रामस्थ पाहतात.
श्री दत्तमंदिर
कशेळी बांध येथे फोडकर वाडीच्या सुरुवातीला स्वामी विश्वनाथ महाराज बोरकर यांनी आपल्या स्वखर्चाने त्यांना दत्तमहाराजांच्या दृष्टांतानंतर बांधलेले मंदिर. परिसरातील हे पहिलेच दत्त-मंदिर. दत्तजयंतीच्या पूर्वी ६ दिवस उत्सव आणि ७ दिवस अखंड तंबोऱ्यासह नामस्मरण चालू असते.
पुरुख
कनकादित्य मंदिराशेजारीच. पूर्वी हरिजन मंडळींचे हे देऊळ मानले जाई. हरिजनांनी बौद्ध धर्म स्वीकारल्यामुळे या देवळाकडे दुर्लक्ष झाले आहे.
जीर्णोद्धाराची आवश्यकता
याशिवाय गावात १) ब्राह्मण देव आणि २) पावनदेवी ही दोन मंदिरे पडक्या अवस्थेत असून त्यांचा जीर्णोद्धार आवश्यक आहे.