राजापूर तालुका, रत्नागिरी जिल्हा, महाराष्ट्र पिनकोड 416707

परंपरा

कशेळीच्या परंपरा

देव-देवळांच्या भोवती गुंफलेली कशेळीची सांस्कृतिक परंपरा शेकडो वर्षांची आहे. वर्षभर भरणारे उत्सव, यात्रा, सांस्कृतिक नाट्य-प्रयोग व कलाकारीच्या परंपरा यांमुळे ग्रामस्थांचा एकोपा अबाधित आहे.

वार्षिक उत्सव व यात्रा

  • श्री कनकादित्य उत्सव : माघ शुद्ध ७ ते ११ — गावच्या मुख्य दैवताची भव्य यात्रा.
  • श्री जाखादेवी नवरात्र : कनकादित्य मंदिराशेजारील जाखादेवीचा नवरात्र उत्सव.
  • श्री आगबादेवी प्रसाद : लांबवरून भक्तगण नवस फेडण्यासाठी येतात.
  • श्री दत्तमंदिर उत्सव : दत्तजयंतीच्या आधी ६ दिवस उत्सव; ७ दिवस अखंड तंबोऱ्यासह नामस्मरण.

नाट्य-संगीताची परंपरा

कै. विठ्ठल सीताराम गुर्जर यांनी संगीत नंदकुमार, संगीत प्रणयमुद्रा, संगीत राजलक्ष्मी ही संगीत-नाटके लिहिली; गंधर्व नाटक मंडळीने ती रंगभूमीवर सादर केली. एकच प्याला, कवडी चुंबक यांसारखी नाटकेही गावात नियमित बसवली जात. १९८७ साली त्यांच्या २५ व्या स्मृतिदिनी ‘एकच प्याला’ पुन्हा सादर करण्यात आले.

मुष्टिफंड संस्था

सांस्कृतिक कार्यक्रम व नाटक-प्रयोगांसाठी पडदे, स्टेज-सामग्री व इतर साहित्य पुरविणारी मुष्टिफंड संस्था ही गावच्या नाट्यपरंपरेला सतत आधार देत आली आहे.

कारागिरीच्या परंपरा

  • गलबत-बांधणी : कशेळीच्या सुतार-कारागिरांची ख्याती करवार-गोवा-मुरुड-जंजिऱ्यापर्यंत होती. सविस्तर →
  • गणपती मूर्ती-कलाकार : गावात अनेक मूर्तिकार पारंपरिक पद्धतीने गणपतीच्या मूर्ती तयार करतात.
  • बांबू-कारागिरी : सुपे, रोवळ्या, टोपल्या, धान्याच्या कणगी पुरातन कालापासूनचा धंदा.
  • तेलघाणी : तीळ, उडीद, भुईमूगाचे तेल काढण्याची परंपरा आजही जिवंत आहे.

सलोखा व समाजकार्य

ब्राह्मण, मराठा, सुतार, गुरव, बौद्ध व मुस्लिम समाज शेकडो वर्षे एकत्र राहत आला आहे. कै. वि. सी. गुर्जर यांनी १९५२ साली “हरिजनांच्या मुलांना पाणी मिळावे” हा लेख लिहून जातीनिष्ठ भेदांविरुद्ध स्पष्ट भूमिका मांडली — ही गावच्या समाज-सुधारणावादी परंपरेची साक्ष.