ऐतिहासिक वारसा
कशेळीचा ऐतिहासिक वारसा
कशेळीचा इतिहास हजार वर्षांहून अधिक मागे जातो. परंपरेनुसार सूर्यनारायणानेच आपल्या प्रतिष्ठापनेसाठी या गावाची निवड केली; आद्य शंकराचार्यांनी गावाला भेट दिली असून, शिलाहार राजा गंडरादित्य, शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झाली आहे.
मुख्य ठेवण
- श्री कनकादित्य सूर्यमंदिर — भारतातील दुर्मीळ सूर्यमंदिरांपैकी एक. इसवी सन १२व्या शतकात मुस्लिम आक्रमणाच्या काळी द्वारका बंदरातून दक्षिणेकडे होडीने आणल्या जात असलेल्या मूर्तीने कशेळीच्या किनाऱ्यावर ठाण मांडले अशी आख्यायिका. मंदिराच्या ताम्रपटातून ८०० वर्षांहून अधिक इतिहास स्पष्ट होतो.
- श्री लक्ष्मीनारायण मंदिर — कनकादित्यापेक्षाही जुने मानले जाते; तळघरातून थेट समुद्रकिनाऱ्यापर्यंत पोचणारा भुयार आहे असे म्हणतात. संभाजी महाराजांनी जीर्णोद्धार केल्याचे स्मरण आहे.
- श्री जाखादेवी, श्री आगबादेवी, श्री दत्तमंदिर — ही गावदैवते अनेक शतकांची साक्ष आहेत.
- देसाई बांध (खार बांध) — सुमारे ४०० वर्षांपूर्वी रामजीपंत ठाकूर देसाई घराण्याने दुष्काळी रोजगारासाठी बांधलेला; आजही गावाच्या भातशेतीचा कणा आहे.
- नाना शंकर शेठ बांधलेला सभामंडप — कनकादित्य मंदिरातील ८०′ × ४०′ आकाराचा भव्य सभामंडप कै. नाना शंकर शेठ यांनी पुत्रजन्माच्या प्रसंगी बांधून दिला.
- १८६१ साली स्थापन झालेली शासनमान्य मराठी शाळा — कशेळीच्या आधुनिक शैक्षणिक वारशाची सुरुवात.
- विसाव्या शतकातील साहित्यिक वारसा — थोर मराठी कथाकार कै. विठ्ठल सीताराम गुर्जर यांच्या लेखणीने कशेळीचा वारसा महाराष्ट्राच्या साहित्य परंपरेत रोवला.
१९६२ साली कै. गुर्जरांच्या निधनानंतर त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ १९६७ साली स्थापन झालेले श्री लक्ष्मीनारायण शिक्षण प्रसारक मंडळ व त्यांच्या नावे चालविले जाणारे विठ्ठल सीताराम गुर्जर विद्यामंदिर — हा कशेळीच्या जिवंत वारशाचा आधुनिक टप्पा आहे.